शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:19 AM2024-10-15T08:19:00+5:302024-10-15T08:19:52+5:30

टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे.

Big decisions of Shinde government; Toll-free access to cars in Mumbai Relief to many including middle class, implementation started | शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू

शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू

मुंबई : मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलकी वाहने, एसटी बसेस आणि स्कूल बसेसना टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

 टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे. मुंबईतील पाच प्रवेश मार्गांवरून शहरात प्रवेश करताना व बाहेर जाताना वरील वाहनांना आता टोल द्यावा लागणार नाही. लहान कारला टोलमुक्ती मिळाल्याने मध्यमवर्गीयांमधून विशेष आनंद व्यक्त होत आहे. जड वाहने आणि खासगी बसेसना मात्र टोल नाक्यांवर टोल द्यावा लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. 

वेळ, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल
मी आमदार असताना टोलमाफीचे आंदोलन केले होते. कोर्टातही गेलो होतो. मला आनंद आहे, लाखो लोकांना या टोलमाफीमुळे दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळ, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. 
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

वाहतूककोंडीतून होणार सुटका
-टोलमाफीमुळे वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. सध्या मुंबईत प्रवेश करणाऱ्या चारचाकी हलक्या वाहनांकडून ४५ रुपये, मिनी बसकडून ७५ रुपये, ट्रककडून १५० तर अवजड वाहनांकडून १९० रुपये टोल आकाराला जातो.

-मुंबईतील पाच टोलनाक्यांवरून दरमहा साधारणपणे ६० लाख वाहने ये-जा करतात. गत ऑगस्ट महिन्यामध्ये या ५ टोलनाक्यांवरून ६१ लाख ९३ हजार वाहनांनी प्रवास केला. त्यातून तब्बल ४२ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळाले. यामध्ये ४२ लाख ६१ हजार कारचा समावेश होता. या कार चालकांकडून २२ कोटी ५५ लाख रुपयांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळाले होते.

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव -
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण असेल. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.

भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड आणि ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहीसर येथील पथकर नाक्यावर टोल वसुली केली जाते. आता या नाक्यांवर टोलमधून सूट दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबईतील पाचही टोलनाक्यांची मुदत डिसेंबर २०२६ मध्ये संपत आहे. टोलमाफीमुळे टोल वसुली करणाऱ्या कंपनीला नेमकी किती रक्कमेची भरपाई द्यावी लागेल, याची आकडेवारी सध्या महामंडळाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. 

महत्त्वाचे निर्णय - 
-धारावी पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची १२५ एकर जागा देणार 
-राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार -आगरी समाजासाठी महामंडळ -दमणगंगा एकदरे-गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता 

Web Title: Big decisions of Shinde government; Toll-free access to cars in Mumbai Relief to many including middle class, implementation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.