चिपळूण : उद्धव सेनेचेआक्रमक नेते भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर आलेले असताना विक्रांत जाधव यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी गप्पा मारल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची गुहागर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा आहे. मागील विधानसभेवेळी प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती. यावेळी विधानसभा लढायची, असाच त्यांची इच्छा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहे. अजित पवार यांची भेट घेऊन विक्रांत जाधव आणि भास्कर जाधव यांचे पक्षावर दबावचंत्र टाकण्याचे प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन "मला काही सांगायचे आहे.." असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. राष्ट्रवादीत असताना मंत्री होतो तरीही शिवसेनेने मला मंत्रिपदाची संधी नाही, याचे शल्य बोचत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानिमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर एकप्रकारे जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती.
आमदार जाधव यांच्या शिस्तीचे पालन !या भेटीविषयी विक्रांत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अजित दादांची घेतलेली भेट केवळ कौटुंबिक होती. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. आमदार भास्कर जाधव यांनी दिलेल्या शिस्ती प्रमाणे ही भेट घेतली. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. आपण जिल्हापरिषद अध्यक्ष असताना ६५ कोटींचा निधी त्यांच्या माध्यमातून मिळाला. त्याशिवाय आपल्या शहरात राज्याचा नेता येतो तेव्हा त्यांचे स्वागत करायचे, ही भास्कर जाधव यांची शिकवण आहे. उद्या देशाचे नेते शरद पवार येणार आहेत तेव्हाही त्यांची भेट आवर्जून घेणार असल्याचे विक्रांत जाधव यांनी सांगितले.