मुंबई : भारतातील पॅकेजिंग उद्योगामध्ये सर्वसमावेषक वृद्धीची, ग्रामीण संपन्नता निर्माण करण्याची तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे. पॅकेजिंगला उद्योगाने महिला बचत गटाच्या उत्पादनांना, ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलेला तसेच आदिवासींनी तयार केलेल्या वनांवर आधारित वस्तूंना बाजारपेठक्षम बनविण्यास मदत केल्यास या वर्गांची आर्थिक उन्नती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी येथे केले.भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या अंधेरी (पूर्व) येथील मुख्यालयात पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र मत्स्योद्योग, दुग्धव्यवसाय व फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. संत्री, द्राक्ष, केळी, चिकू, अल्फांसो आंबे, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे येथे मोठ्या प्रमाणात होतात. मात्र अन्नप्रक्रिया व पॅकेजिंग अभावी अंदाजे ३० टक्के फळे व भाज्या वाया जातात. पॅकेजिंग क्षेत्राने नवीनतम डिझाईन व तांत्रिक ज्ञानाच्या मदतीने ही नासाडी थांबविण्यासाठी तसेच फळांचे शेल्फ-लाइफ वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.भारतीय पॅकेजिंग उद्योगाने ‘परवडण्याजोगे गुणवत्तापूर्ण’ पॅकेजिंग निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांनी या वेळी केले. पुढील ५० वर्षांमध्ये भारत संपूर्ण विकसित राष्ट्र असेल, असा सार्थ विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
‘पॅकेजिंग’कडून मोठ्या अपेक्षा
By admin | Published: May 16, 2015 3:28 AM