मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (दि.21) मतदान पार पडले. आता येत्या गुरुवारी 24 तारखेला लागणाऱ्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, निकालापूर्वी राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल, अशी आकडेवारी सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधून दिली आहे.
न्यूज18 आणि आयपीएसओएसने केलेल्या एक्झिट पोलनुसार परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार आहे. परळी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या चुलत बहीण-भावात होत असलेली अटीतटीची लढत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांसाठीही राजकीयदृष्ट्या ही अस्तित्वाची लढाई आहे. पण, एक्झिट पोलनुसार या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परळी मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ‘बिग फाइट’ असल्याचे पाहला मिळते. विशेष म्हणेज, 2016 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या गटाने बाजी मारली होती. पंकजा मुंडे या मंत्री असतानाही परळी नगरपालिकेत सत्ता आणू शकल्या नाहीत, याची त्यावेळी खूप चर्चा झाली. यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या एक्झिट पोलनुसार विधानसभेसाठी राज्यात भाजपाला तब्बल 243 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, गेल्या निवडणुकीत स्वतंत्र लढूनही प्रत्येकी 40 जागा जिंकणारे काँग्रेस, राष्ट्रवादी यंदा एकत्र लढूनही 50 चा आकडा गाठू शकणार नाहीत, अशी एक्झिट पोलमधील आकडेवारी सांगते.