पिंपरी: कोरोनातून निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज दिले. पण या पॅकेजमध्ये केवळ मोठ-मोठे आकडे पाहायला मिळाले. प्रत्यक्षात वेगवेगळ्या राज्यातील गरीब जनतेच्या हातामध्ये किती पैसा जाणार आहे. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु, दिवसभरात काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करतानाच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजविषयी शंका देखील उपस्थित केली.
पीसीएनटीडी'तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे, पीसीएनटीडी'चे सीईओ प्रमोद यादव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, प्रशांत शितोळे यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, लॉकडाउनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून नोकऱ्या, व्यवसाय, व्यवहार बंद आहेत. सगळे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढायचा आहे, असे त्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. मंत्रीमंडळात त्याबाबतचा लवकरच निर्णय होईल. तसेच केंद्र सरकारशी कोरोनातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मिळविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे महाराष्टातून खूप मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग बाहेर जात आहे. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान भागात कामगार गेला आहे. त्यांची वाट बघत असताना आपल्या राज्यात जिथे मागासलेला भाग आहे. तिथल्या गरीब वगार्ने काम मिळविण्याचा प्रयत्न करावा. कामगाराला काही कौशल्य द्यायचे असेल. तर, राज्य सरकार देईल. परंतु, राज्यातील मजूरालाच कसे काम मिळेल. ते कटाक्षाने पाहिले जाईल. कामगार काम करायला तयार झाला. तर, राज्यातील बेरोजगाराला चांगल्या प्रकारे संसार चालविण्यासाठी मदत होईल.'
कोरोना आटोक्यात येण्यासाठी राज्य सरकाराचे सवोर्तोपरी प्रयत्नपुणे, पिंपरी-चिंचवड शहराची कोरोनासंदर्भात आम्ही माहिती घेत असतो. जादा अधिकारी दिले आहेत. कोरोना आटोक्यात येण्यासाठी राज्य सरकार सवोर्तोपरी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण कमी दिसत होते. परंतु, अलिकडच्या काळात शहरातील नागरिक गावांमध्ये जायला लागल्याचे प्रमाण वाढल्यापासून ग्रामीणभागातही रुग्ण संख्या वाढायला लागली आहे. परंतु, रुग्ण संख्या वाढत असली. तरीही खबरदारी घेतल्यास घाबरण्याचे कारण नाही,असेही मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.