- हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 04 - मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पासह नदी, नाले, बंधा-यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सततधार पावसामुळे काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून त्यात जिल्ह्यातील मोठे १, मध्यम ४ व लघु २४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्प परिसरातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.
सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, परिसरातील गावाची पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी जिल्ह्यात मोठे ३, मध्यम ७ व ८१ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पातील संकलीत साठा ५३५.५० दलघमी असून आतापर्यंत ३५६.५० दलघमी साठा आला आहे. त्याची टक्केवारी ६६.५५ आहे. दरवर्षी आतापर्यंत पावसाच्या लहरीपणामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाला होता. तर अनेक प्रकल्प ठोरडे पडले होते. मात्र यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाला, तसेच परतीच्या पावसाने मागिल आठवड्यात ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दमदार हजेरी लावल्याने व नियमित सततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प
ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यात मोठ्या नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या ३ प्रकल्पापैकी खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. मध्यम पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ प्रकल्पापैकी पलढग, मस, कोराडी व उतावळी हे ४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर ८१ लघु प्रकल्पापैकी २४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्प परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.
ओव्हरफ्लो झालेले २४ लघु प्रकल्प
जिल्ह्यातील २४ लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यात चिखली, झरी बु.,मासरूळ, कंडारी, पिंप्री गवळी, रायपूर, मिसाळवाडी, गारडगाव, केशवशिवणी, अंचरवाडी-१, अंचरवाडी-२, पिंपळगाव चिलम, टाकळी, हिवरखेड-१, गणेशपूर,
हिवरखेड-३ पिंपळगाव नाथ, पिंपळनेर,पळशी, धनवटपूर, कळमेश्वर, कंडारी, ढोरपगाव, विद्रुपा यांचा समावेश आहे.
सोयाबीन, कापूस पिकाला फटका
जिल्ह्यात मागिल दोन आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस पिकाला होणार आहे. सोयाबीन सोंगणीला आली असून काही शेतात सोयाबीनचा शेंगा जमिनीवर पडत आहेत. मात्र पावसामुळे त्या काढता
येत नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर मोताळा तालुक्यासह कपाशी पेरा असलेल्या भागात कपाशीच्या कैºया किड पडून सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटन येण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पिकांना त्याचा कमी-जास्त प्रमाणात फटका बसणार असल्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.