एकीकडे प्रतिमा बनविण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अजित पवारांना Ajit Pawar त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये काका शरद पवारांनी Sharad Pawar पहिला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख अजित गव्हाणे यांच्यासह नगरसेवकांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदी बाग येथे हा प्रवेश पार पडला. अजित पवार यांच्या नेतृत्वात गेलेले राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक पुन्हा शरद पवार यांच्या छत्रछायेखाली आले आहेत. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर अजित पवार गटातील अनेक आमदार, नेते पुन्हा शरद पवारांकडे येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापैकीच पहिला गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आला आहे. पिंपरी-चिंचवड विभागातील राष्ट्रवादीच्या चार पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामे दिले होते. त्यांच्यासह एकूण २४ जणांनी आज घड्याळ सोडून तुतारी हातात घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या पाठोपाठ आता अजित पवारांच्या चार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी परतीची वाट धरली आहे.
पंधरा वर्षे शहराचे अजित पवारांचं ‘दादा’पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता. सलग १५ वर्षे तेच शहराचे ‘दादा’ होते. परंतु, २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणली. मात्र, जुलै २०२३ मध्ये पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरात लक्ष घातले. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. अन् अजित पवार गटाला शहरात गळती लागल्याचे चित्र आहे.