आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटातील मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला अजितदादा गटातील मंत्र्यांसह काही समर्थक आमदारही उपस्थित आहेत. दरम्यान, आज सकाळपासूनच देवगिरीवर अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांची गर्दीही दिसून येत आहे.
देवगिरी बंगल्यावर होत असलेल्या या बैठकीत अजित पवार यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत अजित पवार गटातील मंत्र्यांसोबत आमदार दत्ता भरणे, निलेश लंके, शेखर निकम हेही उपस्थित असल्याचे वृत्त आहे.
आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, मनसेने टोलवरून पेटवलेलं आंदोलन, राज्याची आरोग्य व्यवस्था याबाबत चर्चा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीपूर्वी अजित पवार गटाकडून देवगिरीवर ही खलबतं सुरू आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार हे अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर कुठलीही नाराजी असल्याने नाही तर प्रकृती बरी नसल्याने बैठकीला उपस्थित राहता आले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले होते.