Maha Vikas Aghadi MVA ( Marathi News ) :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून जागावाटपावरून महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील मविआमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मात्र या चारही पक्षांतील विविध नेत्यांकडून जागांच्या वाटपावरून दावे-प्रतिदावे करत एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. मित्रपक्षातील नेतेच टीकास्त्र सोडू लागल्याने मविआच्या कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता नवी दिल्ली येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांची बैठक होणार आहे.
दिल्लीत १४ किंवा १५ तारखेला होणाऱ्या या हाय व्होल्टेज बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपावर एकमत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जो पक्ष ज्या ठिकाणी मजबूत असेल ती जागा सदर पक्षाला दिली जावी, या सूत्राच्या आधारे मविआचे हे नेते जागावाटपावर तोडगा काढणार असल्याचे समजते. जागावाटपाचा तिढा जितक्या लवकरात लवकर सुटेल तितका फायदा मविआला निवडणुकीत होईल, असं या सर्वच नेत्यांचं म्हणणं असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कोणता पक्ष किती जागा लढवण्याची शक्यता?
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून आतापर्यंत मविआचे विविध संभाव्य फॉर्म्युले समोर आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला १८ ते १९ जागा, काँग्रेसला १३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा, वंचित आघाडीला २ जागा, स्वाभिमानी शेतकरी पक्ष २ जागा आणि बहुजन विकास आघाडी १ जागा देण्यावर एकमत होऊ शकतं. मात्र अजून चार जागांवर असलेल्या चर्चा अंतिम टप्यात असून लवकरच मविआचे अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतून सहा लोकसभा जागांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागा शिवसेना उबाठा लढवण्याची शक्यता असून उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार असून उत्तर पूर्व मुंबईची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येण्याची शक्यता आहे. तर रायगड, संभाजी नगर या दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे. काँगसच्या १३ जागांमध्ये उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, भिवंडी, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, तर वंचितसाठी अकोला, शिर्डी आणि राजू शेट्टी यांना कोल्हापूर, हातकणंगले, तर बहुजन विकास आघाडी सामील झाल्यास त्यांना पालघरची जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे.