मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:25 AM2024-07-22T11:25:29+5:302024-07-22T11:27:50+5:30
क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच ते सात आमदारांवर काँग्रेसकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
Congress MLA ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणूक निकालानंतर काँग्रेस आक्रमक भूमिकेत असून क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच ते सात आमदारांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांनी पक्षादेश डावलला त्या आमदारांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्याही नावाची चर्चा आहे. अशातच आज जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे.
जितेश अंतापूरकर हे सुरुवातीपासूनच अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्यासोबत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे या आमदारांनी लगेच भाजप प्रवेश करणं टाळलं आणि ते काँग्रेससोबतच राहिले. मात्र विधानपरिषद निवडणुकीत सदर आमदारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेला आदेश डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली असून ते आगामी काळात काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नाना पटोलेंनी काय इशारा दिलाय?
विधानपरिषद निवडणूक निकाल लागताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. "निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठवला आहे. या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद असतील, लवकर त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल," असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं. "ज्यांनी कालच्या निवडणुकीत पक्षाची साथ सोडली त्यांना किंमत मोजावी लागेल. चंद्रकांत हंडोरे जून २०२२ मधील राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हाही काही जणांनी पक्षाशी गद्दारी केलेली होती. त्यावेळी चौकशी समितीही नेमलेली होती, त्यावेळी पक्षाला दगा देणारे आमदार याहीवेळी तसेच वागले. आणखी काही नावे त्यात जोडली गेली," असे पटोले म्हणाले होते.