मोठी बातमी: विधानपरिषदेत घात करणाऱ्यांना काँग्रेसचा दणका; 'या' ५ आमदारांचं तिकीट कापणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:14 PM2024-08-06T16:14:20+5:302024-08-06T16:15:58+5:30
क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तिकीट देणार नसल्याचे समजते.
MLC Election 2024 ( Marathi News ) : काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली होती. मात्र पक्षाला दगाफटका देणाऱ्या या आमदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं. त्यानंतर आता या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याच्या सूचना थेट काँग्रेस हायकमांडकडून राज्य पातळीवरील नेत्यांना देण्याची आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय आहे त्यामध्ये हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दिकी आणि मोहन हंबर्डे यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस तिकीट देणार नसल्याचे समजते.
दरम्यान, क्रॉस वोटिंगच्या आरोपामुळे ज्या आमदारांचं तिकीट कापलं जाणार आहे त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नक्की कोणत्या आमदारांचं तिकीट कापणार आणि त्यांच्या जागी कोणाला संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
जागावाटपाबाबत लवकरच मविआची महत्त्वाची बैठक
काँग्रेस नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येतील आणि त्यांची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होईल. याबाबत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माहिती दिली आहे.
ऑक्टोबरमध्ये निवडणूक
महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांनी आपला जनाधार मजबूत करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने काँग्रेसचा उत्साह वाढला आहे.