Maharashtra Politics : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शपथविधीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, पण अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरले नाही. अशातच, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी सहा दिवसांनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदेंच्या भेटीसाठी फडणवीस थेट त्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या शाहांसोबतच्या बैठकीनंतर शिंदे आपल्या गावाकडे निघून गेले होते. दोन दिवस तिथे मुक्काम केल्यानंतर ते मुंबईला परतले, पण त्यांनी कोणाचीही भेट घेण्यास नकार दिला होता. तसेच त्यांनी आपल्या नियोजित बैठकाही रद्द केल्या होत्या. आता शपथविधीला अवगे 48 तास शिल्लक असताना फडणवीस आणि शिंदेंची भेट झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये सूमारे अर्धा तास चर्चा झाली.
दरम्यान, फडणवीसांच्या भेटीपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंची वर्षावर भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. आधी महाजन, फडणवीसांचा निरोप घेऊन वर्षावर गेले होते. तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत काही मिनिटे चर्चा झाली. यानंतर शिंदेंचा निरोप घेऊन महाजन फडणवीसांकडे गेले. त्याच्या काही वेळानंतर स्वतः फडणवीस वर्षावर दाखल झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवाय, फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकृतीचीही विचारणा केली.
आझाद मैदानावर शपथविधीयेत्या 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा शपथविधी सोहळा अतिशय भव्य-दिव्य होणार आहे.यासाठी स्वतः पंतप्रदान नरेंद्र मोदींसह अमित शाहा आणि भाजपचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. शिवाय, देशभरातील अनेक नेत्यांना आणि साधू संतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय, या कार्यक्रमात हजारो लाडक्या बहिणी आणि लाडके शेतकरीही सहभागी होणार असल्याची माहिती आहे.