Eknath Shinde: पालकमंत्र्यांच्या नेमणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. विश्वासात न घेता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय घेण्यात आल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे थेट दरे या आपल्या मूळ गावी पोहोचले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन दरे इथं जाणार असल्याचे समजते.
नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना तर रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपने आपल्याकडे घेत रायगडमध्येही राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदाबाबत भ्रमनिरास झाल्याने दुखावलेले एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या नाराजीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, आता चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का आणि पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा सुटणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नाराज नेत्यांकडून पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार
शिंदेसेनेला रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करायची होती. रायगड जिल्ह्यात गोगावले यांचे भावी पालकमंत्री असे बॅनरही लागले होते, मात्र अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्याने गोगावले यांनी दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिंदेसेनेचे दादा भुसे होते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने घेऊन तिथे गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने भुसे नाराज होते, त्यातून त्यांनी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री न घेण्याचे ठरवले होते असे समजते. या वादातूनच मुख्यमंत्र्यांना या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली.