अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद सण एकामागोमाग एक असल्याने दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सौहार्द रहावे यासाठी ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ ऐवजी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी देण्यात आली आहे. हा बदल मुंबईपुरताच मर्यादित असला तरी उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन सुट्टी बदलाचा निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी दि.१६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याची अधिसूचना शुक्रवारी काढण्यात आली. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी १८ सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे सुट्टी देखील त्या दिवशी द्यावी अशी मागणी मुस्लिम आमदार आणि संघटनांनी केली होती. यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन १६ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून १८ सप्टेंबर करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.