State Governemnt Decision ( Marathi News ) : परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाला विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्याकार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असं आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन रुपये ५० आकारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विलंब शुल्क माफ करणे / विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. शासनाने वाहनधारक व विविध संघटना यांच्या निवेदनांचा व मागणीचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरुन विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शासनाने ११ जुलै २०२४ रोजीच्या निर्देशाद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५० इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरणासाठी प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सादर करावीत, असेही परिवहन आयुक्त भिमनवार यांनी म्हटलं आहे.