Pune MPSC Student ( Marathi News ) : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्रीपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनीही याप्रश्नी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली आणि अखेर आयोगाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याबाबत काही निर्णय होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे," अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांची आक्रमक भूमिका
पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी भेट घेतली. तसंच त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यामुळे एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी विविध माध्यमांतून शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे," असा आरोप खासदार सुळे यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या अन्य मागण्या कोणत्या?
कृषी विभागातील २०२१ तसेच २०२२ मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. तसेच २०२३ आणि २४ मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या लायब्ररी समोर एकत्रित येत आंदोलन केले. रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी रस्त्यावर जमा झाले होते. आज सकाळपासूनही हजारो विद्यार्थी पुन्हा लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा झाले आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही. तसेच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या कृषी पदवीधरांची कोंडी झाली आहे. वय वाढत चालले असून आमच्या भविष्याचे काय? असा प्रश्न कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकतेच २५८ पदे एमपीएससीकडे भरती साठी वर्ग केली आहेत. ही पदे २०२४ च्या जाहिरातीत समाविष्ट करावीत आणि परीक्षा घ्यावी. त्यामुळे कृषिप्रधान देशात कृषी पुत्रांना न्याय मिळेल अशा भावना आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.