MPSC Result ( Marathi News ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या अंतिम निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर गुरुवारी हा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील अजय कळसकर हा मुलांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून मुलींमध्ये मयुरी सावंत हिने या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. "महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे," अशी माहिती आयोगाकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सदर परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्या पुण्यातील अजय कळसकर या विद्यार्थ्याला परीक्षेत ३०५.५० आणि मुलाखतील २४ असे एकूण ३२९.५० गुण मिळाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस निरीक्षकपदासाठी ६ जुलै २०२२ आणि १७ जुलै २०२२ रोजी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल आता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असला तरी खेळाडू प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या संबंधित काही तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची पडताळणी करून खेळाडू प्रवर्ग सोडून उर्वरित ९५८ पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा कधी होणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अराखीव खुल्या गटातून अर्ज केलेल्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ करिता दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आणि दि. २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षेचे आयोजन केले होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दि. २६ फेब्रुवारी रोजी राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आली.