Mahavikas Aghadi ( Marathi News ) :महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी दोन पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरही महाराष्ट्रात मविआला घवघवीत यश मिळालं. लोकसभेनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांवर लागलं असून त्यासाठीची मोर्चेबांधणी करण्यासही सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीला तीनही पक्षांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच निवडणुकीआधी मविआकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाणार नसल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांची काल नवी दिल्ली इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेतृत्वाकडून आपल्याला आगामी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची असल्याचं राज्यातील नेत्यांना सांगण्यात आलं. तसंच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधी ठरवला जाणार नसल्याचं सांगण्यात आल्याचे समजते.
काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या दमदार यशानंतर काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठक पार पडली. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असं या बैठकीत ठरलं आहे. त्यानुसार लवकरच मित्रपक्षांसोबत समन्वयासाठी एक समिती बनवा आणि संयुक्त रणनीतीवर काम करा अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षातील इतर नेते आणि काही नवनियुक्त खासदारही सहभागी होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यात मविआतूनच निवडणूक लढवण्यावर काँग्रेस नेतृत्व आग्रही होते. त्याशिवाय माध्यमांसमोर कुठलीही भूमिका मांडताना एका पक्षाची नको तर महाविकास आघाडीची भूमिका असावी असंही नेत्यांना सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आम्ही लोकसभा प्रतिकुल परिस्थितीत लढल्या. जनतेनं मविआला पाठिंबा दिला. महाराष्ट्राला देशातील विकसित आणि समृ्द्ध राज्य बनवायचं आहे. परंतु भाजपा सरकारने लोकांना महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात टाकलं. राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय झाला. देशात परिवर्तनाचं चित्र आहे महाराष्ट्राने याचे स्पष्ट संकेत दिलेत. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.
मित्रपक्षांवर काँग्रेस नेते नाराज
सूत्रांनुसार, पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तक्रारी मांडल्या आणि नाराजी जाहीर केली. परंतु यावर फारसं लक्ष न देता पुढे चर्चा करू असं काँग्रेस नेतृत्वानं म्हटलं. भाजपाला हरवणं ही आपल्या सगळ्यांचं प्राधान्य आहे असं राहुल गांधींनी नेत्यांना सूचना केल्या.