कोल्हापूर - कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तांत्रिक काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला. त्यानंतर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला. दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पंचगंगा नदीमधील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे आठच्या सुमारास राधानगरी धरणामधील सर्व्हिस गेटचं काम सुरू होतं. त्यावेळी एक दरवाजा खाली घेण्याचं काम सुरू असताना ही तांत्रिक समस्या निर्माण होऊन दरवाजा अडकला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. विसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने नदीतील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीपात्राशेजारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दुरुस्तीचे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे.