विधानसभा निवडणुकीच्या काळात शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठविल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. आयकरच्या नोटीसमध्ये गडाखांच्या कारखान्याला १३७ कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शंकरराव गडाख यांनी २०१९ मध्ये ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर २०२० मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. अपक्ष म्हणून लढलेल्या गडाखांना राष्ट्रवादीचाही तेव्हा पाठिंबा मिळालेला होता. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्या ताब्यात असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याला नोटीस आल्याने राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील हा साखर कारखाना आहे. या भागात गडाख यांचे मोठे प्रस्थ आहे. एकाच कारखान्याला नोटीस आल्याने यामागे राजकारण होत असल्याचा आरोप गडाख यांनी केला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही गडाख यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीदेखील कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्याचा आल्याचा आरोप गडाख यांनी केला आहे. शंकरराव गडाख उद्या या नोटीसीविरोधात कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा मेळावा घेणार असल्याचेही समजते आहे. याबाबतची बातमी एबीपी माझाने दिली आहे.