मुंबई - आपल्या गायनाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रख्यात गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. (Maharashtra Bhushan Award announced to Asha Bhosale)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले आहे.
आशा भोसले यांना २०००-०१ मध्ये चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भारत सरकारने २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता. तर मध्य प्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आज आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. यापूर्वी आशा भोसले यांच्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आतापर्यंत पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर, विजय भटकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, अभय आणि राणी बंग, बाबा आमटे, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, र.कृ. पाटील, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना दिदी, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर आणि बाबासाहेब पुरंदरे या मान्यवरांना देण्यात आला आहे.