मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 09:20 IST2025-03-26T09:19:42+5:302025-03-26T09:20:06+5:30

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Big news MCOCA will be imposed on those who adulterate milk Ajit Pawars strict instructions in the meeting | मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना 

मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना 

Ajit Pawar: भाजप आमदार विक्रम सातपुते यांनी अधिवेशन काळात बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत अजित पवारांनी दिल्या आहेत. "दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा," असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अजित पवारांकडून प्रशासनाला कोणत्या सूचना?

"दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी, पनीरमध्ये ॲनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, भेसळी संदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा, पोर्टल विकसित करावे," असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी डेअरी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवा घेण्यात यावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर दूधभेसळ प्रकरणातील आरोपी कोणीही, कोणत्याही पक्षाचे व कितीही मोठे असतील तरी त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना दिल्या.

दरम्यान, या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विक्रम पाचपुते, आमदार अभिजीत पाटील, आमदार कैलास पाटील यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, गृह तसेच वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तर सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हे देखील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Web Title: Big news MCOCA will be imposed on those who adulterate milk Ajit Pawars strict instructions in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.