- अतुल कुलकर्णीमुंबई - सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या सध्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर आली आहे. महायुतीला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या नावाला शिवसेना आणि काँग्रेसकडून पाठिंबा देण्याची शक्यता असून, शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास उपमुख्यमंत्रिपदाची माळ आदित्य ठाकरेंच्या गळ्यात पडू शकते. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपा आणि शिवसेनेने सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत ताठर भूमिका घेतल्याने राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मतदानानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांच्याकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही पुरेशा जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे 56 जागा जिंकणारी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. बहुमत मिळाल्यानंतर भाजपाने सत्तेत समान वाटा देण्याबाबत नकारघंटा वाजवल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने सरकारस्थापनेबाबतचे इतर पर्याय चाचपून पाहण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी तसे सूचक संकेत दिले होते. राज्यात याआधीही विधिमंडळाची सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. त्यापैकी कुणी राज्यसभेचे सदस्य होते. तर कुणी लोकसभेचे सदस्य होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत नवी जुळवाजुळव होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी: शरद पवार मुख्यमंत्री होणार?; 'असा' ठरला सत्तावाटपाचा फॉर्म्युला
By अतुल कुलकर्णी | Published: November 02, 2019 8:37 PM