रामटेकच्याकाँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी हे लवकरच यावर निर्णय घेणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्र समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनविण्याकरिता जात पडताळणी समितीकडे खोटे दस्तावेज सादर केले व वैधता प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रांची पुनःश्च तपासणी करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल करण्यात आली होती. यावर समितीने वेळोवेळी बर्वे यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु बर्वे या समितीसमोर गैरहजर राहिल्या होत्या.
अखेर समितीने बर्वे यांच्या घराच्या दारावर नोटीस चिकटवून ही अखेरची संधी असल्याचेही म्हटले होते. यानंतरही रश्मी बर्वे चौकशीला उपस्थित न राहिल्याने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समितीने जाहीर केले आहे. यावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून त्यांनी निकाल राखून ठेवला आहे.
या कारवाईवर उमेदवार रश्मी बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे माझे प्रमाणपत्र रद्द केले नसून अनुसुचित प्रवर्गावर अन्याय झाला आहे. एका अनुसुचित समाजाची महिला संसदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी जात असेल तर तिचे खच्चीकरण कसे करावे हे विरोधकांकडून शिकायला हवे, अशी टीका बर्वे यांनी केली आहे.
वैशाली ईश्वरदास देविया ( टेकाडे कॉलोनी, पोस्ट -गोडेगांव टेकाडी, ता. पारशिवनी) यांनी या संबंधीची तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, बर्वे यांनी जात प्रमाणपत्रासाठी खोटे दस्ताऐवज तयार करुन आणि कोणतेही संबध नसलेल्या व्यक्तीला आपले सख्खे नातेवाईक (काका, वडीलांचे भाऊ) दाखवून दुसऱ्याच व्यक्तीचे कागदपत्रे जोडले आहेत. बर्वे यांचे कुटुंब जन्मताच हिंवरा, तालुका-पांढुर्णा, जिल्हा पांढुर्णा, मध्यप्रदेश येथील असून वडील सोमराज गणपत सोनेकर यांचे नावे मुत्यू प्रमाणपत्र तयार करण्याकरिता तहसलिदार नरखेड यांना खोटी माहीती पुरवून खोटे मुत्यू प्रमाणपत्र तयार करुन घेतले आहे.