मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:07 IST2025-04-19T12:06:56+5:302025-04-19T12:07:18+5:30
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच आज संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
Congress Sangram Thopte: पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजप प्रवेशाचा निर्णय पक्का झाल्यामुळेच संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा हात सोडल्याची माहिती असून लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. समर्थकांचा मेळावा घेऊन थोपटे याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
भोर-वेल्हे-मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या संग्राम थोपटे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. थोपटे यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर जायंट किलर ठरले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासूनच संग्राम थोपटे काँग्रेसपासून अलिप्त झाले होते. त्यातच भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी मध्यस्थी करत थोपटे यांचे भाजप नेतृत्वाशी बोलणे करून दिल्याचे समजते. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच आज संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
थोपटेंच्या राजीनाम्याने पुणे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार
संग्राम थोपटे हे आपल्या सुरुवातीच्या राजकीय वाटलाचीपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांचे वडील अनंतराव थोपटे हेही काँग्रेसचे आमदार होते. संपूर्ण घराण्याला काँग्रेसची पार्श्वभूमी असतानाही थोपटे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यामुळेच थोपटे यांनी तसा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला होता. परंतु आता त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन कमकुवत होण्याची शक्यता आहे.
संग्राम थोपटेंची नाराजी
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संग्राम थोपटे यांचे नाव वारंवार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांना त्या पदाने हुलकावणी दिली व अडीच वर्षानंतर आघाडीची सत्ताही गेली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोपटे यांचा पराभव झाला. पक्षापासून ते तेव्हापासून बाजूलाच झाले होते. त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असून पुढील दोन ते तीन दिवसांत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.