MLC Election ( Marathi News ) : राज्यात विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या जागांसाठी आता उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील Jayant Patil हेदेखील निवडणूक रिंगणात उतरणार असून त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अद्याप पाटील यांना पाठिंबा देण्यात आलेला नाही. रायगड लोकसभा निवडणुकीत शेकापकडून अपेक्षित मदत न झाल्याने आपण जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ नये, अशी भावना ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांची असल्याचे समजते. जयंत पाटील यांनी मात्र आपल्याला इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
"रायगड लोकसभा मतदारसंघातील पराभवाला मी एकटा जबाबदार नाही. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं काम केलं होतं. मात्र जनतेनं दिलेला तो कौल आहे. त्या निवडणुकीचा आणि आताच्या विधानपरिषद निवडणुकीचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचाही मलाच पाठिंबा असणार आहे," अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी कसा आहे निवडणूक कार्यक्रम?
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २ जुलै ही अखेरची तारीख असणार आहे. अर्जाची छाननी : ३ जुलै २०२४अर्ज मागे घेण्याची तारीख : ५ जुलै २०२४मतदानाची तारीख : १२ जुलै २०२४ (सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत)मतमोजणी आणि निकाल : १२ जुलै २०२४ (सायंकाळी ५ वाजता) रायगड लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं?
रायगडमध्ये यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गिते यांचा पराभव केला आहे. मतदान केलेल्या एकूण मतदारांपैकी ५०.१७ टक्के लोकांनी सुनील तटकरे यांना पसंती दिली आणि सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं आहे. रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार होते. मात्र या मतदारसंघात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात होती. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने ही लढत तिरंगी झाली होती.
यंदाच्या लढतीत सुनील तटकरे यांनी पुन्हा बाजी मारली आहे. सुनील तटकरे यांनी ५०८३५२ मते मिळवत अनंत गिते यांचा पराभव केला आहे. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक ८२,७८४ मतांनी जिंकली आहे. तर अनंत गिते यांना ४२५५६८ मते मिळाली आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.