Shiv Sena Uddhav Thackeray: "महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासमोर आमची भांडणं किरकोळ असून एकत्र येणं आणि एकत्र राहणं कठीण नाही," असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी आवाहन केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. फक्त एकदा सोबत आल्यानंतर समोर जे चोर आहेत त्यांच्या गाठीभेटी घेणार नाही, त्यांचा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या, अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे. भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, "मराठीच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मीही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं मीदेखील आवाहन करत आहे. पण आमची फक्त एक अट आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीही आम्ही सांगत होतो की, महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे हे गुजरातला घेऊन चालले आहेत. तेव्हाच जर त्यांना विरोध केला असता तर आज जे सरकार दिल्लीत बसलंय ते तिकडं बसलं नसतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि पुन्हा तडजोड करायची, हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही, हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा," असं उद्धव यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.
"बाकी आमच्यातील भांडणं, जी काही भांडणं कधी नव्हतीच, तीही आजपासून मिटवून टाकली चला. महाराष्ट्राच्या हितासाठी मग सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की, भाजपसोबत जायचं की माझ्या शिवसेनेसोबत यायचं. पण आधी ठरवा की, कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठी आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे. हे आधी ठरवा आणि मग जो काही पाठिंबा द्यायचा असेल, विरोध करायचा असेल तो बिनशर्त द्या, माझी काही हरकत नाही. महाराष्ट्राचं हित ही एकच अट आहे माझी. पण एकदा सोबत आल्यानंतर बाकीच्या चोऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत आणि त्यांचा प्रचार करायचा नाही. याबाबत आधी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची आणि त्यानंतर आम्हाला टाळी द्यायची," अशी भूमिकाही उद्धव ठाकरेंनी मांडली आहे.
दरम्यान, जाहीर व्यासपीठांवरून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमधील युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याने आगामी काळात ही चर्चा कोणतं वळण घेते आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मार्ग मोकळा होता का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.