Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आतापर्यंत जवळपास ६० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. अशातच आता भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भाजप नेते आणि खासदार नारायण राणे व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे.
नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे निलेश राणे यांना इथून विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घ्यावा लागणार आहे. याबाबतच चर्चा करण्यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. तसंच लवकरच निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करतील, असेही समजते.
दुसरीकडे, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र ते ज्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे तो मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे आहे. त्यामुळेच आज धनंजय महाडिक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र कोल्हापूर उत्तर आणि कुडाळ या दोन्ही जागांवर भाजप नेत्यांचे पुत्र हाती धनुष्यबाण घेऊन लढणार की मुख्यमंत्री शिंदे मन मोठं करत ही जागा भाजपसाठी सोडणार, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून महायुतीत वाद
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेने पाचवेळा भगवा फडकवला आहे. त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे, तर २०२२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपमध्ये झालेल्या थेट लढतीत भाजप उमेदवाराने ८० हजार मते घेतल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने या जागेवर प्रबळ दावा सांगितला आहे. त्यात महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी संधी मिळाल्यास लढणार असल्याचे जाहीर केल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि इच्छुक उमेदवार राजेश क्षीरसागर अस्वस्थ झाले आहेत. या जागेवरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमध्येच धुसफूस वाढली आहे.