राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देऊ शकते अशी माहिती समोर येतेय. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात होती. त्याचा निकाल आता गुरुवारी लागण्याची शक्यता आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी एका सुनावणीदरम्यान यावर टिपण्णी केली. घटनापीठाकडून गुरुवारी दोन महत्त्वाचे निकाल लागण्याची शक्यता आहे. घटनापीठातील एक न्यायमूर्ती १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
सरकार कोसळणार की राहणार?काही कायदेतज्ज्ञ १६ आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा करत आहेत. तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करत आहेत. मात्र, यातच शिंदे गटाकडून या प्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आधी निकाल येऊ द्या मगच सर्वांनी आपले ज्ञान पाजळावं. सर्व जण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनंच लागेल. कारण आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असं शिरसाट यांनी म्हटलं.