मोठी बातमी: महाराष्ट्रातील त्या बड्या नेत्याशी संबंधितांकडे सापडले बेहिशेबी १८४ कोटी, मालमत्तांची खरेदी, कारखान्यांत गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:26 AM2021-10-16T07:26:02+5:302021-10-16T07:26:39+5:30
Income Tax Raid in Maharashtra: पीटीआयने वरिष्ठ नेता म्हणजे उपमुख्यमंत्री Ajit Pawar असल्याचा उल्लेख सूत्रांच्या आधारे केला आहे. प्राप्तीकर खात्याने ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, बारामती, गोवा व जयपूर येथील बांधकाम क्षेत्रातील दोन समूहांच्या १० ठिकाणांवर छापे घालण्यात आले होते.
नवी दिल्ली : प्राप्तीकर खात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील एका वरिष्ठ नेत्याशी नातेवाईकांशी संबंधित प्रतिष्ठाने आणि निवासस्थानांवर घातलेल्या छाप्यांमध्ये १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने मिळालेला हा पैसा वापरण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली.
पीटीआयने वरिष्ठ नेता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा उल्लेख सूत्रांच्या आधारे केला आहे. प्राप्तीकर खात्याने ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, बारामती, गोवा व जयपूर येथील बांधकाम क्षेत्रातील दोन समूहांच्या १० ठिकाणांवर छापे घालण्यात आले होते. त्यात १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या कारवाईत २.१३ कोटी रुपये बेहिशेबी रोख व ४.३२ कोटी रुपयांचे दागिने ताब्यात घेण्यात आले.
दोन समूहांनी विविध कंपन्यांशी संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचे आढळले आहे. त्यात बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्जे , नसलेले वाद लवादातून सोडविल्याचे भासवून मिळविलेला पैसा आहे. हा पैसा प्रभावी कुटुंबाच्या सहभागाने मिळाल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवर छापे घातल्याची माहिती अजित पवार यांनी ७ तारखेला दिली होती. (वृत्तसंस्था)