शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 02:10 PM2024-10-11T14:10:06+5:302024-10-11T14:11:04+5:30
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. हा आवाज जनतेचा आहे. त्यामुळे उमेदवार बदलावा असं आवाहन स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांना करण्यात आले आहे.
इंदापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या या खेळीने भाजपाला धक्का बसला परंतु आता हीच खेळी उलटणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात पवार गटातील राष्ट्रवादी नेते एकवटल्याचे चित्र इंदापूरात पाहायला मिळाले. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शाह यांच्या उपस्थितीत आज परिवर्तन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, आज इतक्या मोठ्या संख्येने लोक इथं जमलेत. इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ज्याच्यात धमक असते तो काम करतो. लोकांसमोर काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. मागील ८ दिवसांत काय घडामोडी घडल्या, लोकसभेत कुणी कुणी प्रामाणिक काम केले हे कळायला हवं. २०-२५ वर्ष राजकारणात जबाबदार व्यक्ती म्हणून काम करतोय. २०१४ साली अडीच वर्ष अगोदर मला सांगितले, मला लढायला सांगितले. निवडणुकीला अर्ज भरायला ४ दिवस राहिले तेव्हा अप्पासाहेब मलाच उभं राहायचं सांगितले, आमची समजूत काढली, पवार कुटुंबाचं मी ऐकलं. या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. २०१४ ची निवडणूक झाली, २०१९ मध्येही मी साहेबांकडे चारवेळा चक्करा मारल्या. परंतु २०१४, २०१९ ला नाही. आता आपलं काही खरं नाही असं आम्हाला वाटतं असं त्यांनी सांगितले.
तसेच विश्वासाला माझ्यासारखा भोळा भाबडा कार्यकर्ता बऱ्याचदा बळी पडलाय. विश्वास दिला, चर्चा झाल्या अनेक लोक साक्षीदार होते. यावेळी मला मदत करा, पुढच्या वेळी मी तुम्हाला मदत करतो असं राजकारण झालं. कोविडचा अडीच वर्षाचा काळ गेला. कारखान्याची निवडणूक लागली त्यातही लबाडी झाली. आम्हाला विचारात घेतले नाही. २५-३० वर्ष या तालुक्यात काम करताना आमचं कुठे चुकलं? आम्ही कुणाचे पैसे घेतले नाहीत. पदरचे पैसे खर्च करतोय. आज आम्ही अपक्ष उभं राहायचा विचार करतोय. मेळाव्यातून लोकांसमोर भूमिका घेऊ असं ठरलं. उद्याच्या निवडणुकीत आपल्याला काय करायचं हे जनतेनं सांगावे असं आवाहन अप्पासाहेब जगदाळे यांनी लोकांना केले.
दरम्यान, उद्याची निवडणूक परिवर्तनाची आहे. तुमची साथ, तुमची हाक हवी. तुम्ही जर साथ दिली तर प्रविणभैय्या असेल किंवा आम्ही असू. तुमचे विचार आम्ही ऐकू..आम्ही काय केले पाहिजे हे जनतेनं सांगावे. इंदापूर तालुक्याच्या इतिहासात एवढी संख्या कधीही जमली नसेल इतके प्रेम, आम्हाला आशीर्वाद दिला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांना आवाहन आहे. जर या तालुक्यातील जनतेवर तुमचे प्रेम असेल. कुणीही मोठा कार्यकर्ता नसताना तुम्हाला लोकसभेत २६ हजारांचे लीड दिले आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय बदलणार की नाही हे उद्या जाहीर करा असंही अप्पासाहेब जगदाळे यांनी केले.
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. हा आवाज जनतेचा आहे. आवाज कुणी थांबवू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. लोक प्रामाणिकपणाला साथ देतात. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही हे लक्षात घ्या असा इशाराही शरद पवारांना परिवर्तन मेळाव्यातून देण्यात आला आहे.