NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची काल केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर आज सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू असलेल्या आऊटगोईंगबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार हे काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.
"तुमच्या पक्षातून मागील काही दिवसांपासून आमदार आणि नेते बाहेर पडत आहेत. सतीश चव्हाण यांच्यासह आमदार अतुल बेनके हेदेखील शरद पवारांना भेटून आल्याची चर्चा आहे. याबाबत तुमचं मत काय?" असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर भडकलेले अजित पवार म्हणाले की, "मी खंबीर आहे. तुम्ही सांगत असलेली माहिती खोटी आहे. अतुल बेनके कुठेही गेलेले नाहीत. ज्या आमदारांना मी तिकीट देणार नाही असेच लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत. ज्यांना मी तिकीट देणार आहेत ते आमदार माझ्याच पक्षात आहेत," असा दावा त्यांनी केला आहे.
अजितदादांची साथ सोडण्याच्या वाटेवर कोणते नेते?
सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांच्या पक्षाला एका मागून एक हादरे बसत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्या पाठापोठ जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड होणार, हे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सतीश चव्हाण यांनी एक पत्र लिहून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता सतीश चव्हाण यांनीही पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच चव्हाण हे सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी नेते आणि माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनीही आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.