अमरावती - उद्घाटनापासूनच सतत वादात असलेल्या समृ्द्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार आता समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर लोहोगाव पुलावर जीवघेणा खड्डा पडला आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यानं कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर हा खड्डा पडल्याचं निदर्शनास आले आहे.
लोहगाव येथील स्मशानभूमीजवळील समृद्धी महामार्गाच्या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यातील काँक्रीट भरभरून खाली कोसळले. सुदैवाने या ठिकाणी आतापर्यंत अपघात झाला नाही. लोहगावनजीक एक कि.मी. लांबीचा पूल आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता पुलावरील काँक्रीट खाली कोसळताना शेतकऱ्यांना दिसले. मात्र वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज दोन वर्षे झाले आहेत.
तथापि, काम निकृष्ट झाल्याने दोन वर्षांमध्येच या महामार्गावर खड्डे पडले. खड्यातील लोखंडी सळखी तुटल्याचे दिसत आहे. महामार्गाच्या बाजूला असलेले कुंपणावरील तार चोरीला गेले. लोखंडी अँगल चोरट्यांनी लंपास केले. रोडवरील अंधारात चमचम करणारे एलईडी दिवे निघाले आहेत. पुलावरील साइडच्या भिंतीला तडे गेले आहेत.
रात्री रोडवरचे काँक्रीट पुलाखाली कोसळताना दिसले. पुलावर कोणतेही वाहन उभे दिसले नाही. मात्र, खड्डा पडलेला दिसला, कदाचित खड्डात वाहन पडून मोठा अपघात झाला असता - बबन आंधळे, शेतकरी, लोहगाव
अज्ञात ट्रकने जॅक लावल्याने खड्डा पडला आहे. दोन-तीन दिवसांत दुरुस्ती करण्यात येईल - अमित कुमार, इंजिनियर, एनसीसी कंपनी
‘समृद्धी’चा तिसरा टप्पा; लोकार्पण होणार ४ मार्चला
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या ४ मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाने नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला असून, आता सुमारे ६०० किमी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.