Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दौरे करत जनतेला संबोधित करताना दिसत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना एका प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून, वॉरंट रद्द करण्यात आले आहे. परंतु, यावेळी न्यायालयाने मनोज जरांगेंना दंडही ठोठावला आहे.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केले आहे. वॉरंट रद्द करताना न्यायालयाने मनोज जरांगे पाटील ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. तसेच एक जमीनदार द्यायला सांगितला आहे. सन २०१३ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोज जरांगेंविरोधात वॉरंट जारी झाले होते. त्यानंतर मनोज जरांगे न्यायालयासमोर हजर झाले. मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली होती.
एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते
कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर मनोज जरांगे न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते, असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या गुन्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते.