ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाविरोधातील समता पार्टीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 01:38 PM2022-10-19T13:38:03+5:302022-10-19T13:39:24+5:30
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आज दिल्ली हायकोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आज दिल्ली हायकोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या गटाला दिलेल्या मशाल चिन्हाविरोधात समता पार्टीने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले होते. तसेच खरी शिवसेना कुणाची यावरून सुप्रिम कोर्टात लढाई सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच उद्धव ठाकरेंचा गट आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला तात्पुरते नवे चिन्ह आणि नाव दिले होते. त्यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले होते. मात्र हे मशाल चिन्ह आपले असल्याचा दावा करत समता पार्टीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, समता पार्टीच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच मशाल चिन्हावरील समता पार्टीचा दावा अयोग्य असल्याचा निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहणार आहे.
काही वर्षांपूर्वी समता पार्टीचे विलीनीकरण झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह गोठवले होते. आता ठाकरे गटाने मशाल चिन्हाची मागणी केल्यावर निवडणूक आयोगाने हे चिन्ह खुले केले होते.