ठाणे - शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही पण सामाजिक कार्य करत आलोय. आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडू असं विधान वकील वैजनाथ वाघमारे यांनी केले आहे.
त्याचसोबत सुषमा अंधारे यांच्यासोबतच्या नात्यावर वाघमारेंनी खुलासा केला. ते म्हणाले की, सुषमा अंधारे आणि माझ्यात मतमतांतरे आहेत. गेल्या ५ वर्षापासून आम्ही वेगळे राहतोय. सुषमा अंधारे यांच्याशी राजकीय किंवा सामाजिक विषयावर कुठल्याही प्रकारे संवाद नाही. अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्यात दुरावा आला. राष्ट्रवादीत भाडोत्री वाहन म्हणून त्या गेल्या. त्यानंतर आमच्या खऱ्या नात्याला तडा गेला. तेव्हापासून आमच्यात मतभेद झाले असं त्यांनी म्हटलं.
तसेच सुषमा अंधारे यांना नेताच करायचा होता पण त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य नव्हता. सुषमा अंधारे या तोफ वैगेरे काही नाही. त्या कुठून आल्या, कशा आल्या त्याबाबत सविस्तार खुलासा करणार आहे. वेळ पडली तर सुषमा अंधारे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची भूमिका माझी आहे. माझे नेते एकनाथ शिंदे जे काही आदेश देतील त्याप्रकारे पक्षाचं काम चांदा ते बांदा करणार आहे असंही वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं.
कोण आहेत सुषमा अंधारे? आंबेडकरी चळवळीतल्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख होती. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. अलीकडेच शिवसेनेतून एकामागोमाग एक नेते पक्ष सोडून जात असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले. त्यात संजय राऊतांसारखा आक्रमक नेता पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत गेला. राऊत यांच्या तुरुंगवारीत ठाकरेंची बाजू सडेतोड आणि आक्रमक शैलीत मांडून सुषमा अंधारे या शिवसेनेत फायरब्रँड नेत्या बनल्या. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ठाकरेंनीही प्रत्येक ठिकाणी सुषमा अंधारे यांना भाषणाची संधी दिली. अंधारे यांनी पंतप्रधानांपासून भाजपा नेते आणि शिंदे गटातील ४० आमदारांवर वेळोवेळी बोचऱ्या शब्दात घणाघात केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सुषमा अंधारे प्रसिद्धीझोतात आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"