राकेश खराडे, लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : कोचीन येथून गुजरातच्या भरूच येथे प्रोपोलीन हा अतिज्वलनशील गॅस घेऊन निघालेल्या टँकरला तमिळनाडूमधील विजय मंगल या टोलनाक्याजवळ रविवारी गळती लागली. स्थानिक यंत्रणांनी प्रयत्न करूनही ती न थांबल्याने अखेर संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी यातील तज्ज्ञ असलेले रसायनीतील धनंजय गिध यांना बोलावले. त्यांच्यासाठी रस्तामार्गे विमानतळापर्यंत व पुन्हा घटनास्थळापर्यंत सोमवारी खास ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. अखेर त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून ही गळती रोखल्यानंतर टँकर पुन्हा इच्छितस्थळी रवाना केला.
सेफ्टी व्हॉल्व्ह लिक झाल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने स्वतःकडे सेफ्टी किट असूनही घाईत मोकळ्या हाताने लिकेज थांबविण्याचा प्रयत्न केला होता.
गिध यांच्यासाठी केली खास व्यवस्था
- गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणांना कळवले. मात्र, ते लिकेज थांबवणे त्यांच्याही आवाक्याबाहेरचे होते. टँकर हा बालाजी ट्रान्स्पोर्ट कंपनीचा होता. त्यांना रसायनीतील गिध यांचा या बाबतीत गाढा अभ्यास असल्याचे ज्ञात होते. त्यांनी लागलीच गिध यांना संपर्क करून सर्व पार्श्वभूमी सांगितली.
- गळतीवर नियंत्रण न आणल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने त्यांची मदत लागणार आहे असे सांगितले. यानंतर त्यांनी स्पॉटवर लिकेज कंट्रोल करण्यासाठी आलेल्या सुरक्षा यंत्रणांना मार्गदर्शन केले. मात्र, त्यांना यश न आल्याने गिध यांनीच प्रत्यक्ष त्याठिकाणी यावे यासाठी सुरक्षा यंत्रणांनी विनंती केली.
- गिध यांना येण्या-जाण्यासाठी विमानाच्या प्रवासाचा आणि इतर वाहनांचा बंदोबस्त केला गेला. या ऑपरेशनसाठी रसायनी-मोहोपाडा येथून निघालेल्या गिध यांच्या वाहनाला सर्व टोलनाक्यांवरून लेन मोकळी ठेवली होती.
रायगडची मान उंचावली
या कामगिरीने फक्त अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे नव्हे तर खालापूर तालुका आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचीदेखील मान उंचावली आहे. रोटरी क्लब ऑफ - पाताळगंगा, लायन्स क्लब ऑफ खोपोली, खोपोली आणि खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि अनिल विभूते, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि तहसीलदार आयूब तांबोळी यांनी गिध यांचे कौतुक केले.