पुणे : विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना अचानकपणे १००० व ५०० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. निवडणुका लढविण्यासाठी ज्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करून ठेवली त्यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. आता काय करायचे हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काळा पैसाच बाद केल्याने या निवडणुकांमध्ये पैशांचा धूर काढून त्या लढविणे अवघड बनले असून यामुळे पैशांच्या जोरावर निवडणुका लढविण्याचे मनोरे रचणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे सर्वच प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना खर्च करण्यासाठी विशिष्ट मर्यादा ठरवून दिली जाते, मात्र काही अपवाद वगळता राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून याचे पालन केले जात नाही. आयोगाच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट पैसे खर्च होतात. राजकीय नेत्यांकडून कमावलेला पैसा हा प्रामुख्याने ठेकेदाराने दिलेला ब्लॅक मनी असतो, बहुतांशदा तो रोख स्वरूपातच असतो. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांवर, प्रचारावर होणारा खर्च बऱ्याचदा दाखविता येत नाही, त्यासाठी रोख स्वरूपातच पैसे खर्च केले जातात. त्यामुळे राजकीय नेत्यांकडे रोख रक्कम प्रचंड प्रमाणात असते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ती आणखीनच जास्त प्रमाणात अनेकांनी जमा करून ठेवली होती. त्या सगळ्यांची आता मोठी गोची झाली आहे. कार्यकर्त्यांच्या नावावर नोटा बदलून घेण्याचा एक पर्याय राजकीय नेत्यांकडे उपलब्ध असला तरी मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम बदलून घेणे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये पैशांचा वापर खूपच कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
By admin | Published: November 09, 2016 3:08 AM