सातारा:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आदित्य ठाकरेही राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, दुसरीकडे शिंदे गटालाही राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. साताऱ्यातील शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता २५ पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्तेही त्यांच्याच मार्गावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जाधवांनी इतर शिवसैनिकांना संपर्क करत आता शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत मनपरिवर्तन करत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, खंडाळा तालुक्यातील सुमारे २५ पदाधिकाऱ्यांसह १०० पेक्षा जास्त शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशात आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असून साताऱ्यात शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला
खंडाळा येथे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असा विश्वास दिला आहे. तसेच आता शिवसेनेचा जिल्हाप्रमुखही शिंदे गटाच्या गळाला लागल्याच्या चर्चा साताऱ्यात सुरू आहेत. साताऱ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटातील नेत्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. यामुळे नक्की किती शिवसैनिक शिंदे गटात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्या गटाला मिळाले पाहिजे, असे प्रयत्न शिंदे गटाचे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पुरुषोत्तम जाधव हे मितभाषी आहेत. जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत जाधव यांच्या असलेल्या संपर्काचा फायदा उचलत त्यांना जिल्हाभर फिरवून संपर्कातले पदाधिकारी कसे जाळ्यात येतील, यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसऱ्या बाजुला जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आता तोकडी पडताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे ३ जिल्हाप्रमुख काम करत आहेत. तरीही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचं चित्र आहे. जिल्हा शिवसेनेत समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जाते. तसंच पक्षाचे संपर्कप्रमुखच संपर्काच्या बाहेर आहेत, अशी अवस्था असल्याची चर्चा आहे.