Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, शिवसेनेतील गळती काही केल्या थांबताना दिसत नाही. शिवसेनेसह युवासेनेतीलही पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. यातच आदित्य ठाकरेंसह युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनाही एक मोठा धक्का बसला असून, राज्य विस्तारक पदावर असलेल्या नेत्याने युवासेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
युवासेनेचे राज्य विस्तारक अजिंक्य चुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. त्यांनी वरूण सरदेसाई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. अजिंक्य चुंबळे यांना वरून सरदेसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांनी सरदेसाई यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. अजिंक्य चुंबळे यांचे वडील शिवाजी चुंबळे आणि आई कल्पना चुंबळे हे देखील सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करायच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही
युवा नेते शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी युवासेनेच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. इथे शिवसेनेत कुठला गट-फिट काय नाही. फक्त शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदेंनी आपला गट स्थापन केला आहे. महाराष्ट्रातील जनता ही शिंदे गटाला मानत नाही, या शब्दांत कोळी यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन
सत्तेसाठी शिवसेनेसोबत गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाणे पसंत केले. या गद्दारांच्या मानगुटीवर शिवसेना बसणार आहे. त्यांची औकात दाखवणार आहे, अशी बोचरी टीका शरद कोळी यांनी शिंदे गटावर केली. आदित्य ठाकरेंनी माझ्यावर युवासेना राज्य विस्तारकपदाची जबाबदारी सोपवली आहे. गाव तिथे युवासेनेची शाखा ही संकल्पना राबवत राज्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन, असा निर्धार कोळी यांनी व्यक्त केला.