Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यातच आता आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या एका गावात शिवसेनेला दणकून फायदा झाला आहे. ज्या गावात आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्याच गावात शिवसेनेची बिनविरोध सत्ता आली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, या मंत्रिमंडळात पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना संधी मिळाली आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून धक्का बसला आहे. भुमरे यांच्या मतदारसंघातील ज्या गावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्या गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर शिवसेनेचे १३ पैकी १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'शिव संवाद यात्रा'
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातून आधी निष्ठा यात्रा आणि नंतर शिव संवाद यात्रा काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहे. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन गावात सुद्धा आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सभा घेत जनतेशी संवाद साधला होता. त्यांनतर या गावात झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाने संपूर्ण उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा दावा केला आहे. शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, बिडकीन गावात शिवसेनेला सत्ता मिळाली असली तरीही, गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरे यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. पैठणमध्ये एकूण ७ ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली होती. तर सातपैकी ६ ग्रामपंचायतवर भुमरे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. तर पैठण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत भुमरे यांच्या ताब्यात आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याने तालुक्यात ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.