Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका आणि दौरे यांवर भर देत पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. केवळ शिवसेना नाही, तर राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी होत आहेत. यातच आता राष्ट्रवादी आणि शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. याबरोबरच शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील शेकापचे नेते अर्जुन डांगे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा गटाला समर्थन देत लाल बावट्याची साथ सोडली. पनवेल संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील झाले.
शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्याच महिन्यात पनवेलमध्ये शिंदे गटाकडून मनेला खिंडार पाडण्यात आले होते. पनवेल, उरणमधील नाराज मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शेकापमधील माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांन देखील शिंदे गटात प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे. पनवेलमध्ये महाविकास आघाडीची ताकद कमी आहे. त्यातच आता शिंदे गटामध्ये होणाऱ्या इनकमिंगमुळे महाविकास आघाडी पनवेलमध्ये अजूनच कमकुवत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शेकापच्या डांगे यांच्यावर शहर उपाध्यक्षाची जबाबदारी होती. शिवाय पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक थोरात यांनी स्थानिकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे खांदेश्वर वसाहतीसमोरील उड्डाणपूल आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न सुटला आहे. शिवाय दुधविक्रीतून स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अभ्यासू नगरसेवक म्हणून थोरात यांची ओळख आहे. त्यामुळेच राऊत आणि थोरात यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे पनवेलमध्ये शिंदे गटाची ताकद वाढल्याचे सांगितले जात आहे.