Maharashtra Politics: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यात भाजप आघाडीवर आहे. भाजपने देशातील काही विशेष मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, आगामी निवडणुकीत त्या मतदारसंघात कमळ फुलवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय मंत्रीही कामाला लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही मतदारसंघ असून, सर्वाधिक लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीची सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शिंदे गटही तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, यातच बारामतीमधील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याला खिंडार पडल्याचे चित्र आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
शिंदे गटातील प्रवेशाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी मंत्री विजय बापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"