Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीला बळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्ती मागे घेऊन पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पक्का केला असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन बारामती हाती घेतले आहे. बड्या नेत्याची भाजपमध्ये होत असलेली एन्ट्री या मिशन बारामतीचे पहिले मोठे यश मानले जात असल्याची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे हे पुरंदरमधील मोठे नाव असून, हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याची चर्चा
अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशानंतर पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असे वाटत नाही. ते पक्ष सोडतील, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असल्याचे म्हटले जात आहे. भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठे बळ मिळणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. मिशन बारामतीचा भाग म्हणूनच टेकवडे यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे. टेकवडे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक तसेच कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचे काही मुद्दे पटले आणि पुरंदरचे प्रश्न सोडवून विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला, असे अशोक टेकवडे यांनी म्हटले आहे.