Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला ऐतिहासिक खिंडार पडले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मात्र, यानंतर आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असून, केवळ शिवसेना नाही, तर अन्य पक्षातूनही शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असून, ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन दिवाळीतच मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे मंत्री प्रा. तानाजी सावंत यांची कोल्हे यांनी भेट घेतली असून, दिवाळीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे दिलीप कोल्हे यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाले शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. आता शिंदे गटाकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे.
मी का जातोय, याचे आत्मचिंतन करा, मग बोला
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून, दिवाळीनंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने यांनी दिलीप कोल्हे यांना फोन करून थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा, मी का जातोय, याचे तुम्ही व शहराध्यक्ष जाधव आत्मचिंतन करा, मग माझ्याशी बोला,' असा उलट सवाल केल्याचे कोल्हे यांनी केल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, दिलीप कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांची उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्या कार्यालयात रात्री भेट घेऊन चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर कोल्हे कायमच टीका करत होते. सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दिलीप कोल्हे हे महेश कोठे यांच्यासोबत दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"