Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले. टोकाला गेलेल्या संघर्षात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. यातच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने ठाकरे गटात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
सामूहिक राजीनाम्याबाबत बोलताना, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे म्हणाले की, पक्षाचे कार्य करण्यासाठी जे सक्षम नाहीत त्यांना काढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यातूनच हे राजीनाम्याचे नाट्य घडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामा थेट उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. यानंतर जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी आणि वरोरा तालुक्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
सत्ता असून समस्या, वरिष्ठांचे दुर्लक्ष
शिवसेना तालुका प्रमुखपदी नरेंद्र नरड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिवसेना सत्तेत असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यात कुणीही मदत करायला तयार नव्हते. संघटन वाढीसाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठ पदाधिकार्यांनी आमच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले, असा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले आहे.
दरम्यान, शिवसेनेतील मोठ्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. राज्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते स्वतःकडे ओढण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र असल्याचे दिसत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"