पुणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या अनेक दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. यातच आता पुण्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहेत. एका बड्या नेत्याने शिंदे गटात एन्ट्री घेतली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. आता फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे बडे नेते शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आधी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच विधानसभेत आणखी चार-पाच जण येऊ शकतात, असा दावा करण्यात आला होता. यातच आता पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे हे शिंदे गटात सामील झालेत.
हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ
हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. नाना भानगिरे शिंदे गटात सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. भानगिरे यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती.
दरम्यान, हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत गेले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे. पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.