मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा झटका दिला आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यासह शिवसेनेच्या ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचं चित्र दिसून आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पालघरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
वसई - विरार मनपातील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारला आपला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच वसई तालुका आणि बाईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये यांनीही हाच निर्णय घेतला आहे. या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते.
बंडखोरांची राजकीय आत्महत्या - संजय राऊतशिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सध्या काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते युती असताना पराभूत झाले होते. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना फटकारलं आहे.
शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नयेठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत जिल्हाप्रमुखपदी म्हस्के यांच्या पुनर्नियुक्तीची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेने हे वृत्त निराधार असून म्हस्के यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन करत पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय शिवसेनेत कुणीही कुणाची नियुक्ती करू शकत नाही असं खडसावलं आहे.