- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याण येथे येणार आहेत. येथील फडके मैदानावर त्यांची सभा होणार असून, पंतप्रधानांचे आणि त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी लागणारे ५०० मीटरचे मैदानच जवळपास उपलब्ध नसल्याने मोठी अडचण झाली आहे. सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मैदानासाठी आता डोंबिवली आणि भिवंडीत चाचपणी सुरू करण्यात आली आहे.पंतप्रधान कार्यालयाच्या नियमावलीनुसार ५०० मीटरच्या मोकळ्या जागेमध्येच पंतप्रधान आणि त्यांच्या सुरक्षा अधिकाºयांचे हेलिकॉप्टर लॅण्ड करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पूरक जागेची माहिती, आराखडा आणि आवश्यक फोटोंसह त्यासंबंधीची सर्व तांत्रिक माहिती पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ मागवली आहे.मोदींच्या निर्धारित दौऱ्यानुसार १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर लॅण्ड होणार असून, दुपारी २ वाजेपर्यंत ते फडके मैदानावरील सभास्थळी पोहोचणार आहेत; मात्र दौरा जाहीर झाल्यापासून पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर लॅण्ड करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पोलीस उपायुक्त संजय शिंदे आणि तहसीलदार अमित सानप यांच्यासह इतर अधिकाºयांच्या ताफ्याने गुरुवारी पहाटेपासून डोंबिवली आणि भिवंडीतील मोकळ्या जागांचा शोध घेतला. त्यासाठी ठिकठिकाणी या पथकाने पायपीट केली.डोंबिवलीतील रिजन्सी इस्टेट आणि पलावा सिटीतील मोकळी जागा, कल्याणमधील सुभाष मैदानाचा परिसर आणि भिवंडीमधील बापगाव परिसरातील मोकळ्या जागांची पाहणी या पथकाने केली. सकाळी ६ वाजेपासून १०.३० वाजेपर्यंत मैदानांचा शोध सुरूच होता. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अडचण समोर न आल्यास भिवंडीतील बापगाव आणि कल्याणमधील सुभाष मैदानाचा प्रामुख्याने विचार होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.जागा निश्चित करून पंतप्रधान कार्यालयास देणार अहवालपंतप्रधानांचे हेलिकॉप्टर कुठे लॅण्ड करावे, यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाची कडक नियमावली आहे. त्यानुसार हेलिकॉप्टर वस्ती नसलेल्या मोकळ्या जागेतच लॅण्ड करणे अनिवार्य आहे. याशिवाय त्या परिसरात वीजवाहक तारांचा अडथळा नसावा. मैदानाचे स्वरूप हे सपाट असावे; ओबडधोबड जागा असू नये. लॅण्डिंग करताना किंवा पुन्हा टेक आॅफ घेताना कोणतेही अडथळे नसावेत आदी तांत्रिक मुद्द्यांवर मैदानांचा शोध सुरू आहे.डोंबिवलीत उपलब्ध असलेल्या जागांच्या परिसरात दाट मनुष्यवस्ती असून, त्या जागा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत समोर आले. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात राज्यमंत्री चव्हाण यांनी पाहणी केली. त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त हेदेखील जागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच हेलिकॉप्टर लॅण्डिंगची जागा निश्चित केली जाणार आहे. जागा निश्चित झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत पंतप्रधान कार्यालयाशी तसा पत्रव्यवहार केला जाईल. पंतप्रधान कार्यालयाने हिरवा सिग्नल दिल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता केली जाणार आहे.हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठी जागा निवडताना तिथे विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहक तारांचा अडथळा नसावा, असा नियम आहे. त्यामुळे जागा निवडताना असा काही अडथळा असलाच तर विद्युत पोल स्थलांतरित करण्यासह अन्य आवश्यक बदलही केले जाणार आहेत. हेलिकॉप्टरसाठी जागा निश्चित झाल्यानंतर त्यादृष्टीने पंतप्रधानांच्या रस्ता वाहतुकीच्या मार्गातही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांचा समन्वय ठेवण्यासंदर्भातही या वेळी चर्चा करण्यात आली.
विरोधकांनी घेतले तोंडसुखविकासाच्या केवळ गप्पा : ठाणे जिल्ह्यातील मतदार समस्यांमुळे त्रस्तडोंबिवली : पंतप्रधानांच्या प्रस्तावित दौऱ्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनीही स्वागत केले आहे. परंतु स्थानिक पातळीवर राज्य शासनासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, दोन खासदार आणि सात आमदारांची यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही विरोधकांनी केली. मोदी येत आहेत, ते देशाचे नेतृत्व करतात, याचा आनंदच आहे. पण स्थानिक पातळीवर सत्ताधारी सपशेल अपयशी ठरलेत त्याचे काय? डोंबिवलीला अस्वच्छ, बकाल शहर अशी उपाधी याच सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्यामुळे मोदींच्या दौºयाकडे उलटा चष्मा लावून बघितले, तर येथील मतदार हा समस्यांनी त्रस्त असल्याचे दिसेल, अशा शब्दांत विरोधकांनी सडकून टीका केली आहे.कल्याणच्या डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही. प्रदूषणात या शहराचा भारतात १४ वा क्रमांक लागतो. स्मार्ट सिटीचा पत्ता नाही. येथील चित्र एवढे भयंकर असताना मोदी येणार आणि प्रकल्पांचे भूमिपूजन करणार, हे कितपत योग्य आहे? कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असतानाही सर्व काही आलबेल असल्याचे का भासवले जात आहे, असाही विरोधकांचा सवाल आहे. गणेश नाईक पालकमंत्री असताना ते पंधरवड्यातून एकदा आढावा बैठक घ्यायचे. आता सहा महिने झाले तरी आढावा बैठक घेतली गेलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे भाजपा सहयोगी आमदार गणपत गायकवाड यांनीच असा आरोप जाहीरपणे केला होता.वाहतूककोंडीमुळे अबालवृद्ध हैराण असून, पाणी प्रश्न पाचवीलाच पूजला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास खुंटलेला असताना पंतप्रधानांसमोर गुलाबी चित्र निर्माण करण्यामध्ये येथील सत्ताधारी यशस्वी ठरले असले, तरीही मतदारांसमोर मात्र एकूणच वस्तुस्थिती आरशासारखी स्वच्छ असून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचे दर्शन सर्वांना होणारच आहे. ही परिस्थिती ओळखून, सत्ताधाºयांनी आतापासून प्रामाणिक काम केले, तरी विधानसभेला त्यांच्या पारड्यात काहीतरी चांगले पडेल, अशीही टीका विरोधकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. पंतप्रधानांचे स्वागतच आहे; पण येथील सत्ताधाºयांनी विकासाचे जे चित्र उभे केले, ते मिस्टर इंडिया चित्रपटातील हीरोसारखे अदृश्य आहे. विकास कधीच दिसला नाही; पण कामे होत आहेत असे भासविण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.मुळात मेट्रो प्रकल्पाचा ‘ट्रॅक’च चुकलेला आहे. लोकसंख्या कोणत्या भागात वाढत आहे, याचा अभ्यासच कुणी केला नाही. प्रस्तावित मेट्रो व्हाया कळवा, मुंब्रा, डोंबिवली मार्गे एपीएमसी करणे अभिप्रेत होते. भिवंडीच्या दिशेने लोकसंख्येचा विस्तार झपाट्याने झालेला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही महत्त्वाची बाब समजून घ्यायला हवी होती. - आनंद परांजपे, ठाणे शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसपंतप्रधानांच्या राष्ट्रकार्याला आम्ही नेहमीच साथ दिलेली आहे. पण शेतकºयांना तसेच प्रकल्पबाधितांना हा मोबदला त्वरित मिळावा. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करण्यात यावे. त्यास विलंब होऊ नये. विकासकामे व्हायलाच हवीत. - संतोष केणे, काँग्रेस नेते, डोंबिवलीमेट्रोचा निर्णय बिल्डरधार्जिणा आहे. ठाणे ते अंबरनाथदरम्यानच्या उपनगरीय प्रवाशांचे आताच प्रचंड हाल होत आहेत. महिलांसाठी विशेष लोकलचा पत्ता नाही. ज्येष्ठांसह विद्यार्थ्यांना दळणवळणाच्या सुविधा नाहीत. बुलेट ट्रेनलादेखील विरोध होत आहे. त्यामुळे मोदी येथे येऊन ज्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा नारळ फोडणार आहेत तो केवळ निवडणूक स्टंट आहे. सिडकोची ९० हजार घरे नवी मुंबई पट्ट्यात होणार आहेत. येथील नागरिकांना त्याचा काहीही लाभ होणार नाही. मतदारांनी आता तरी सतर्क राहावे, नाहीतर राज ठाकरे म्हणतात तसे ‘भोगा आपल्या कर्माची फळं’ याची पुन्हा प्रचिती येईल.- प्रमोद (राजू पाटील), नेते, मनसे