बारामतीत केव्हा काय होईल याचा कोणीच नेम सांगू शकत नाही. कारण पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होऊ घातली आहे. गेल्यावेळी सुप्रिया सुळेंविरोधात लाखो मते पडली होती. आता पवारांच्या घरातील मुलगी आणि सून अशा दोन्ही एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. सुळेंविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले आहे. त्यांच्या अर्जात काही दोष निघाला आणि अपात्र ठरला तर आपला दावा असावा म्हणून खुद्द अजित पवारांनी डमी अर्ज दाखल केला होता. यावरून रोहित पवारांनीही टीका केली होती. आता हा अर्जच बाद ठरला आहे.
सेफर साईड म्हणून अजित पवारांनी आपला अर्जही लोकसभा निवडणुकीसाठी भरला होता. अजित पवारांचा हा अर्ज बाद ठरला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. यामुळे बारामतीत सुळे वि. पवार अशी लढत होणार आहे. आता या आडनावावरूनही अजित पवारांनी वाद छेडला आहे. पवार आडणावाच्या उमेदवारालाच मतदान करा असे भर सभेत सांगत अजित पवारांनी सुळे या बाहेरच्या असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचविले होते. यावर शरद पवारांनी देखील प्रत्तूत्तर दिले होते. यावरून ४० वर्षे झाली तरी सून पवारांची होत नाही का असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला होता. बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळेंना म्हणजेच शरद पवारांना तर विधानसभेला अजित पवारांना मत देणार असे बारामतीकरांचे म्हणणे आहे. हे खुद्द अजित पवारांनी देखील कबुल केलेले आहे. अशातच काही ओपिनिअन पोलमध्ये देखील सुनेत्रा पवारांचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
अजित पवार शरद पवारांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे बारामतीकरांच्या मनात नेमके काय सुरु आहे, थोरल्या पवारांना मतदान करणार म्हणणारे बारामतीकर अजित पवारांच्या या प्रयत्नांना भुलतात का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुळेंचा अर्ज मंजूर, डमीचा नामंजूरशरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचाही अर्ज मंजूर करण्यात आला असून त्यांच्यासोबत डमी अर्ज भरलेल्या सचिन दो़डके यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष अर्ज भरला होता. अजित पवारांकडून एकाच पक्षाचे दोन अर्ज आले होते. यामुळे सुनेत्रा यांचा अर्ज मंजूर करण्यात आला तर अजित दादांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
दुसरीकडे शरद राम पवार या रिक्षाचालकाने देखील अर्ज भरला होता. त्यांचा अर्जही मंजूर झाला आहे. यामुळे शरद पवार नावाचा उमेदवार बारामतीत असणार आहे. आता अजित पवारांच्या 'पवार' नावाला मतदान करण्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे पाहणे निकालाच्या दिवशीच समजणार आहे.